श्री म्हातोबा देवस्थान पुन्हा एकदा राम भरोसे……?
सचिन माथेफोड,पुणे
आळंदी म्हातोबा ग्रामस्थांचे ग्राम दैवत असणाऱ्या श्री म्हातोबा जोगेश्वरी दैवतांच्या नावे श्री म्हातोबा उर्फ श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट पूर्वी स्थापन करण्यात आलेली होती.या ट्रस्टच्या माध्यमातून देवस्थानची स्थावर मालमत्ता संरक्षीत ठेवणे तसेच मंदिर देखभाल दुरुस्ती अशी जबाबदारी पूर्वी संबंधित विश्वस्तांची होती.परंतु कालांतराने यथावकाश यातील सर्वच विश्वस्त मयत झाल्याने सदरील देवस्थान कारभार कोणी पाहायचा हा एक प्रश्न होता.त्याचसोबत देवस्थान अंतर्गत असणाऱ्या शेत जमिनीबाबत न्यायालयात दावे सुरू होते व आहेत.त्यासाठी गरज म्हणून गावपातळीवर सदरील कामाची जबाबदारी कोणीतरी ग्रामस्थांनी घेणे जरुरीचे असल्या कारणाने याबाबत दिनांक ३०/१०/२१ रोजी झालेल्या अडजोर्न्मेंट ग्रामसभेत कोर्टाची कामे पाहण्यासाठी तसेच सध्याच्या देखभालीसाठी कृती समिती स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला.यावेळी ज्यांना या कृती समितीत यायचे आहे त्यांनी स्वखुशीने यावे असे सांगण्यात आले त्यावेळी एकूण ११ सदस्य सदरील कृती समितीत काम करण्यास तयार झाले.
सदरील कृती समिती स्थापन झाल्यानंतर देवस्थानच्या कामास गती मिळेल असे वाटत असतानाच गेले अनेक दिवस झाले देवस्थानचे काम पाहणारे दत्तात्रय नारायण जवळकर यांनी दिनांक ३० रोजी अचानक ग्रामपंचायतीमध्ये राजीनामा सादर केल्या कारणाने ग्रामस्थांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.त्यांनी केलेल्या अर्जानुसार सदरील कृती समिती हे देवस्थान मिळकतीचे राखणदार म्हणून काम पाहत असताना सदरील मिळकतीत अनेक प्रकारे अतिक्रमण होत आहेत.तसेच ते रोखण्यास गेल्यास त्याबाबत मला काही संबंधित लोकांकडून त्रास दिला जात आहे.तरी या मानसिक त्रासाला कंटाळून मी समितीचा राजीनामा देत आहे.
सदरील देवस्थान जमिनीच्या अनेक केसेस कोर्टात दाखल असून देवस्थानच्या बाजूने उभे राहणे गरजेचे असताना हा राजीनामा आल्याने पुन्हा एकदा देवस्थान राम भरोसे झाले अशा ग्रामस्थांच्या मध्ये चर्चा सुरू आहेत.