क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले जयंती साजरी
सचिन माथेफोड
क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त उरुळी कांचन अखिल माळी समाज संघाच्या वतीने तुपे वस्ती उरुळी कांचन येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व उपस्थितांच्या वतीने सावित्रीबाईंच्या अद्वितीय कार्यास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सावित्रीबाई फुलेंचे जीवन चरित्र सांगत असतानाच त्यांनी केलेले सकल समाजासाठीचे कार्य शेकडो वर्षानंतर आजही समाजास दीपस्तंभ प्रमाणे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत असल्याचे सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास, छत्रपती संभाजी राजांच्या बलिदानाच्या इतिहासा प्रमाणेच, जिजाऊ माँसाहेब, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, बाजीराव पेशव्यांपासून ते लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, वीर सावरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज अशा आपल्या तमाम राष्ट्रपुरुषांच्या गौरवशाली आणि अभिमानास्पद कार्याचा इतिहास आपण आवर्जून आपल्या पुढील पिढीस शिकवून एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण करणे, हीच खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांना आदरांजली ठरेल असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे पुणे विभागीय संचालक विकास जगताप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी संजय रायकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, कार्यक्रमाचे नियोजन अखिल माळी समाज संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तुपे वस्ती येथे भानुदास जगताप यांच्या कडे केले होते.