दिल्लीत फडकणार मराठी साहित्याची पताका चपराक प्रकाशनच्या तब्बल 25 पुस्तकांचे संमेलनात प्रकाशन
सचिन माथेफोड,पुणे
पुणे – दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित व्हावीत यासाठी अनेक प्रकाशकांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. यात ‘चपराक प्रकाशन’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील सर्वाधिक पंचवीस पुस्तके प्रकाशित होत असल्याची माहिती प्रकाशक आणि ग्रंथ प्रकाशन समितीचे अध्यक्ष घनश्याम पाटील यांनी दिली.
नाशिकच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांचे पुस्तकानुभव हे वेगळ्या धाटणीचे पुस्तक आहे. यात 1830 ते 1910 या कालखंडातल्या निवडक पन्नास दुर्मीळ पुस्तकांची ओळख करून देण्यात आली आहे.
मुंबईतील काशिनाथ माटल यांनी कोविडच्या काळात ज्यांनी निरपेक्षपणे काम केले अशा कोविडयोद्ध्यांच्या प्रेरक कथा लिहिल्या आहेत. त्यांचा त्यावरील सावट हा कथासंग्रह आणि बेवारस हा दुसरा एक कथासंग्रहही प्रकाशित होतोय. ज्येष्ठ कवी अनंतराव घोगले यांचा सोनचाफा हा द्विभाषिक कवितासंग्रह आहे. त्यांच्या कविता मोडी आणि देवनागरी लिपित एकाचवेळी, एकाच पुस्तकात प्रकाशित होत आहेत.
शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांच्या शिक्षणविषयक पुस्तकमालेतील दहा पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. एकच विषय, एकच लेखक आणि एकच प्रकाशक अशा मालिकेतील शिक्षणावर बोलू काही आणि शिक्षणरंग ही समारोपाची दोन महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित होत आहेत.
मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त आयुक्त गिरीश गोखले यांचे अरे सरकार सरकार हे अनुभवकथन, कराडचे लेखक सुहास कोळेकर यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनासंदर्भात लिहिलेले रॅगिंगचे दिवस हे अनुभवकथन, सुरेखा बोर्हाडे यांनी भारतवर्षातील 67 कर्तृत्ववान महिलांचा आढावा घेतलेला देदीप्यमान शलाका हा लेखसंग्रह, चंद्रलेखा बेलसरे यांचा ओव्हरटेक हा भयकथासंग्रह, सातारचे लेखक डॉ. राजेंद्र माने यांचे मनापासून हे ललित लेखांचे पुस्तक, आशिष निनगुरकर यांचा लालबत्ती ते कारंबा हा पटकथासंग्रह, डॉ. बी. व्ही. कुलकर्णी यांचा परिणीता हा कवितासंग्रह, हिरालाल पगडाल यांचे पुन्हा एकदा लंडन हे प्रवासवर्णन अशी दर्जेदार पुस्तके वाचकांच्या भेटीस येत आहेत.
संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांनी गेल्या वर्षभरात फक्त कोकण याच विषयावरील आठ पुस्तके लिहिण्याचा आणि ती प्रकाशित होण्याचा विक्रम केला आहे. इंडिया रेकॉर्ड बुकने त्यांच्या या लेखन योगदानाची दखल घेतली. आता कोकणातील फुलांची सचित्र आणि तंत्रशुद्धा माहिती देणारे ऋतुरंग हे त्यांचे नवे पुस्तक साहित्य संमेलनात प्रकाशित होत आहे. नाटककार डॉ. सोमनाथ मुटकुळे यांची तीन नाटके प्रकाशित होत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे संजय सोनवणी यांचे रत्नजडीत खंजिराचे रहस्य ही कुमार कादंबरी, जनार्दन देवरे यांनी लिहिलेले क्रांतिकारक सरदार भगतसिंह हे चरित्र, राजेंद्र दिघे यांचा पाखरांची गाणी हा बहुरंगी कवितासंग्रह, नांदेडच्या डॉ. भगवान अंजनीकर यांचे चरित्र स्मरण अशी काही बालसाहित्यातील पुस्तकेही प्रकाशित होत आहेत.
दिल्लीच्या साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशित होण्याचा बहुमान मिळावा यासाठी अनेक लेखक उत्सुक होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील आणि विविध साहित्य प्रकारातील दर्जेदार पुस्तके आम्ही प्रकाशनासाठी निवडली आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन असल्याने राजधानी दिल्लीत आपला आवाज आणखी सशक्त व्हायला हवा. त्या दृष्टिने उत्तमोत्तम पुस्तके निवडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.