शासनाच्या डोळ्याआड अनधिकृत शाळांकडून पालकांची आर्थिक लूट………शिक्षण खात्याने घेतले झोपेचे सोंग,जुलै आला तरी अनधिकृत शाळांची यादीच नाही
सचिन माथेफोड,पुणे
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात.या योजना राबविण्यासाठी अनेक नियमावली देखील जाहीर केली जाते परंतु खाजगी संस्थाचालक मात्र या नियमावलीला फाटा देत विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी वसूल करून स्वतःचे खिसे भरताना दिसतात. शासन दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करत असते जेणेकरून या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक होऊ नये परंतु या यादीतून अनेक प्रसिद्ध शाळा कुणाच्या मेहेरबानीने वगळण्यात येतात हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात अजूनही आहे. अशाच एका अनधिकृत शाळेबाबतचे वृत्त लोकमतने मागील आठवड्यात प्रसिद्ध केले होते त्याचा परिणाम संस्थाचालकांना सर्व विद्यार्थ्यांची जमा असलेली फी माघारी द्यावी लागली होती.तशाच पद्धतीने फुरसुंगी येथील शिव शंभो इंग्लिश मिडीयम स्कूल फुरसुंगी या शाळेने इयत्ता नववी व दहावी या वर्गाना मान्यता नसताना देखील पालकांना अंधारात ठेऊन त्यांच्याकडून हजारो रुपयांची शालेय फी घेऊन हे वर्ग सुरू ठेवले आहे.इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरत असताना ही बाब पालकांच्या निदर्शनात आल्यानंतर पालकांनी यावर आवाज उठविला होता. विद्यार्थी एका शाळेत शिकत आहे व परीक्षा मात्र दुसऱ्या शाळेच्या नावाखाली देत आहेत.फुरसुंगी गावाच्या जवळच असणाऱ्या सोनाई इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेने फुरसुंगी येथील या अनधिकृत शाळेला शिक्षण खात्याची पूर्वपरवानगी न घेता मदत केलेली निदर्शनास आले आहे.त्याचसोबत एकही दिवस विद्यार्थी शाळेत हजर नसताना सोनाई इंग्लिश स्कूल ने या विद्यार्थ्यांना शाळेचे दाखले दिलेले आहेत.याबाबत या शाळेतील प्रशासनाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मी मदत म्हणून या विद्यार्थ्यांना माझ्या शाळेतून परीक्षेला बसविले आहे व परिसरातील अनेक शाळांमध्ये असेच प्रकार चालतात त्यामुळे मी काही चुकीचे केले नाही.
कोट
फुरसुंगीच्या शाळेतील पालक शाम घाडगे
माझी मुलगी शिव शंभो इंग्लिश मिडीयम स्कूल फुरसुंगी याठिकाणी इयत्ता सहावी पासून शिकत होती आता तिने दहावीची परीक्षा दिली त्यावेळी दाखला आणायला गेलो असता मला त्यांनी सोनाई इंग्लिश मिडीयम स्कुलच्या नावाचा दाखला दिल्याने मला आश्चर्य वाटले.ज्या शाळेत माझी मुलगी गेलीच नाही त्या शाळेचा कसा काय मला दाखला दिला हे विचारल्यावर तेथील मुख्याध्यापक देशमुख सर यांनी मला फि भरण्याच्या नावाखाली उडवाउडवीची उत्तरे दिलेली असून माझ्यासोबत इतर पालकांची देखील या शाळेने फसवणूक केलेली असून याबाबत मला योग्य तो न्याय मिळावा.
विशाल हरपळे सामाजिक कार्यकर्ते फुरसुंगी
फुरसुंगी येथील श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट पालकांची,शासनाची अतिशय फसवणूक करत असून शिक्षण विभाग मात्र या ट्रस्टला पाठीशी घालत आहे. अनधिकृतरीत्या अनेक वर्ग चालवत असून देखील तसेच कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असून देखील या ट्रस्टीवर शिक्षण विभाग मेहेरबान कशामुळे आहे.गोर गरीब पालकांकडून हजारो रुपयांची फी हे लोक कोणत्या कारणाने व कुणाच्या पाठिंब्यावर वसूल करत आहेत याबाबत शिक्षण खात्याविषयी उलट सुलट चर्चा आमच्या गावात चौकाचौकात होताना मला ऐकायला मिळत आहे.
चौकट
शिक्षण खाते दरवर्षी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करत असते.यामध्ये अतिशय जाचक अटी असून एक जरी अट अपूर्ण असेल तरी देखील सदरील शाळांना अनधिकृत यादीत टाकले जाते व त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो.परंतु अशा अनेक शाळा आहेत की ज्या कोणत्याच नियमात बसत नसताना देखील त्याचा नामोल्लेख मुद्दाम का टाळला जातो हे शिक्षण खात्याचे न उलगडणारे कोडे आहे.त्याचसोबत मोफत पाठ्यपुस्तके देखील अशा शाळांना नियमावली दूर करून कशी पोहचवली जातात व खरा लाभार्थी यापासून कसा वंचित राहतो याबाबत विस्तृतपणे अधिकारी वर्ग बोलण्याचे का टाळतात.